सातारा ( सम्राट गायकवाड ) : जिल्ह्याचे ठिकाण असलेला सातारा ते फलटण महामार्ग होण्यासाठी शासनाने पाऊले उचलली खरी, मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीने फलटण ते आदर्की ह्या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला असून त्यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त असून अशावेळी सातारा जिल्ह्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले आहेत तसेच ते फलटण (आसू) गावाचे खर्डेकर घराण्याचे जावई देखील आहेत. त्यामुळे फलटणची जनता ह्या रस्त्याचे काम जलदगतीने करून दिलासा देण्याची आर्त हाक त्यांना देत आहे.
फलटण ते आदरकी संपूर्ण रस्ता ठेकेदाराने खोदून ठेवला आहे. मागील दोन वर्षात केवळ ६ किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटीकरण व पुलांची कामे २ वर्षात झाली आहेत.
आता हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडे केवळ १४ महिन्यांचा कालावधी बाकी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत काम पूर्ण करण्याची नोटीस ठेकेदाराला बजावली आहे. पण नोटीस देणे हे तकलादू प्रोसेस असून अभियंत्यांनी सातत्याने लक्ष ठेवून काम करून घेणे गरजेचे होते व आहे.
दोन वर्षापूर्वी फलटण ते आदर्की ह्या 27 किलोमीटरच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तब्बल १२५ कोटी रुपये निधीची तरतूद ह्या महामार्गाच्या कामाला करण्यात आली. सरासरी प्रति किलोमीटर 5 कोटी रुपये अशा पद्धतीने १० मीटर रुंद असे सिमेंट काँक्रिटकरण कामाचे स्वरूप. मात्र, गेल्या दोन वर्षात सुरुवातीला संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना तसेच एस. टी.बसने रोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला व लागतोय. आलिशान गाड्या असणारे नेते, अधिकारी व उद्योजक मात्र पुसेगाव अथवा लोणंद मार्गे साताऱ्याला जात असल्याने त्यांना हा विषय अद्याप गंभीर वाटलेला नाही. परंतु गेल्या दोन वर्षात अनेक दुचाकी चालकांचे ह्या रस्त्यावर अपघात झालेत.
तीन वर्ष कामाची मुदत असलेल्या कामाचे केवळ १४ महिने बाकी राहिले आहेत. निधी अथवा भूसंपादन असे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहिलेले नाहीत. मात्र आजपर्यंत संथ गतीने झालेले काम कुठेतरी अधिकारी ठेकेदारावर मेहेरबान आहेत का ? मुदतवाढ देवून अधिकचा मलिदा खाण्याचा हा उद्योग आहे. ह्या सर्व बाबींना सातारा जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्रेक दिला पाहिजे आणि तत्काळ रस्त्याचा आढावा घेवून काम जलदगतीने मार्गी लावावे, अशी आर्त हाक सासरवाडी येथील जनता देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा