सातारा ( सम्राट गायकवाड) : विधानसभा निवडणूकीत 'अजित दादांचा वादा ' टॅग लाईनवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटणसह संपूर्ण राज्यात ब्रॅण्डिंग करत प्रचार केला. त्यावर फलटणच्या मतदारांनी आमदार देखील निवडून दिले. मात्र, आता एक वर्षाच्या आतच वेगळा अनुभव फलटणच्या मतदारांना येण्यास सुरुवात झालीय. त्यापैकीच धक्कादायक प्रकार ना. अजित पवार यांच्या बारामती लगतच असलेल्या आसू गावाच्या वि.का.स.सेवा सोसायटीच्या बाबतीत घडताना दिसून आला. १०० वर्ष पूर्ण केलेली आणि नफ्यात व पुरेसे भाग भागभांडवल शिल्लक असताना देखील सोसायटीची १७ गुंठे जागा विकण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यास काही संचालक आणि सभासदांनी तीव्र विरोध केला आहे.
सहाय्यक निबंधक, फलटण यांना लेखी निवेदन देवून जागा विकण्यास विरोध दर्शविला असून प्रसंगी सोसायटीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. ह्या पूर्वीच जिल्हा बँकेला सोसायटीने आपली काही जागा दिलेली आहे. आता उर्वरित जागेत सोसायटीने सभासदांसाठी मंगल कार्यालय तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे. अशी मागणी करून संस्था नफ्यात असताना देखील जागा विकण्याचा घाट नेमका कोणासाठी घातला जातोय ? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात आणि बारामती नाजिकच व विशेष बाब म्हणजे राज्याचे सहकार खाते देखील ना.अजित पवार यांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे साहजिकच ना.अजितदादा आपला वादा कशाप्रकारे पूर्ण करतात, हे पाहणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असल्याने महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा