सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

फलटण नगरपालिकेच्या इमारतीतच पाणी गळती ; बांधकामाची दुरुस्ती होईल पण ऑडिट करण्याचे धाडस नूतन मुख्याधिकारी दाखवतील ?


सातारा ( सम्राट गायकवाड ) : राज्यांत चर्चेत असलेली ऐतिहासिक फलटण नगर पालिका आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहराला पाणी पुरवठा तसेच पाणी गळती काढण्याची आणि सार्वजनिक विकास बांधकामे करणाऱ्या फलटण नगर पालिकेच्या नूतन इमारतीला किरकोळ पावसातच  पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. काही वर्षातच स्लॅब असलेल्या इमारतीला गळती लागल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच होणाऱ्या गळतीमुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्येष्ठ आणि दिग्गज दिवंगत नेते यांच्या नावाने फलटण शहरासाठी नूतन इमारत ९ वर्षापूर्वी उभारण्यात आली. पालिकेच्या सभागृहाला देखील ज्येष्ठ नेत्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या इमारतीची गरिमा, प्रतिष्ठा आणि बांधकामाचा दर्जा देखील राखण्याची जबाबदारी पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची आणि आता प्रशासक यांची आहे. नूतन इमारत उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाचे व परिणामी नागरिकांच्या कर रूपाचे खर्च करण्यात आले. मात्र, काही वर्षातच ह्या नूतन इमारतीला पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. विशेष बाब म्हणजे पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पालिकेच्या तिजोरीत भर घालणाऱ्या वसुली विभागातच गळती सुरु झालीय. त्यामुळे अक्षरशः पाणी वाहू नये म्हणून त्या ठिकाणी बादली ठेवावी लागली आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचे दिसून आले.

एकूणच पाणी गळतीने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेच त्याच बरोबर भविष्य काळात इमारतीला होणारा मोठा धोका ओळखून आणि दुर्घटना टाळण्यासाठी बांधकामाचे ऑडिट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालिकेने फलटण शहरात उद्याने, मैदाने कमी आणि शॉपिंग सेंटर अधिक बांधली आहेत. त्या देखील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून नूतन मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव हे सर्व बांधकामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे धाडस करतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

क्रमशः 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...