सातारा ( सम्राट गायकवाड) : 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय ' म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण, अशा ब्रीदवाक्यानुसार पोलीसदलाने कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असते. मात्र, खरचं अशा प्रकारे कारभार न होता अक्षरशः उलट्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातील ठराविक पोलिस अधिकारी आणि लाडक्या कर्मचाऱ्यांकडून कारभार सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांना अजित मल्टीस्टेट बँकेच्या गैरकारभारा विरोधात पीडित शेकडो महिलांना घेवून फलटण पोलीस ठाण्यात कैफियत मांडावी लागते, प्रजासत्ताकदिनी मोर्चा देखील काढावा लागतो, मात्र साधी एक एफ.आय.आर.घेतली जात नाही. हे आहे कायद्याचे राज्य ?
मात्र, ६ मार्च २०२४ रोजी ह्याच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नसताना २० वर्ष प्रामाणिक पत्रकारिता केलेल्या पत्रकाराला बोलावले जाते. तीन तास बसवून ठेवले जाते आणि पुढे बेकायदेशीररित्या खासगी गाडीत डांबून घालत सातारला शहर पोलिस स्टेशन येथे नेले जाते. त्या ठिकाणी तीन तास बसवून ठेवले जाते. अन् मग रात्री १० वाजता खोटी एफ.आय.आर.तयार करून खोटे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, पुढे जेव्हा न्यायालयात निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी त्याबाबतचे फलटण ग्रामीणचे सीसीटिव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागून देखील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक हे जाणीवपूर्वक देण्यास नकार देतात. हे आहे कायद्याचे राज्य...?
त्याच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महाडिक यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि विशेष म्हणजे गृहमंत्रीपद असलेल्या भाजप फलटणचे शहरअध्यक्ष अनुप शहा तसेच २०० पेक्षा अधिक फसवणूक झालेल्या पीडित महिला आपली कैफियत मांडत आहेत. मात्र, ते आवाज ऐकायला तयार नाहीत. एक साधी एफ.आय.आर.देखील दाखल करून घ्यायला तयार नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला एफ.आय.आर.दाखल नसताना निरपराध पत्रकाराला डांबून ठेवतात आणि खासगीत अनेकांना सांगतात माझ्यावर वरिष्ठांचा दबाव होता. हे आहे कायद्याचे राज्य...?
आता भाजप शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी आज शेकडो पीडित महिलांना घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा येथे भेट घेतली. नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक पाहता महायुती सरकार आणि त्यांचे सरकारमधील तिन्ही भाऊ हे आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान करत आहेत तर दुसऱ्या बाजूला फलटण ग्रामीण पोलीस ठण्यासमोर अन् विशेष बाब म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाडक्या शेकडो बहिणी हंबरडा फोडत आहेत. तेव्हा आजच पहिली एफ.आय.आर.दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र, काल २६ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ज्या प्रकारे मोठ्या भाजप शहराध्यक्ष अनुप शहा यांच्याशी सुरुवातीला मोठ्या आवाजात अन् मिडियाचे कॅमेरे दिसल्यानंतर खाली आवाज करून आमचा तपास सुरू आहे, मी चुकलो तर पोलिस अधीक्षक माझ्यावर कारवाई करतील. ही भाषा सरकारच्या लाडक्या आणि हंबरडा फोडणाऱ्या बहिणींना पोलीस निरीक्षकाची आहे. म्हणूनच अशा कायद्याचे राज्य असलेल्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाडक्या बहिणींना आणि नेतृत्व करत असलेल्या अनुप शहा यांना न्याय मिळेल? ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण हे राज्य कायद्याचे आहे ?
विशेष बाब म्हणजे मागील १५ दिवसापूर्वी फलटण तालुक्यातील विडणी येथे शेतात अज्ञात महिलेचा अमानुषरित्या खून झाल्याची घटना घडली. अवयवाचे अनेक तुकडे केल्याने मृत महिलेची ओळख देखील अद्याप पटली नसल्याची माहिती समोर येत आहे अन् दुसऱ्या बाजूला आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. साहजिकच बक्षीस जाहीर करणे कायदेशीर प्रक्रिया असली तरी यावेळी पोलीस दलाच्या डिटेक्शन आणि एल.सी. बी. अशा ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात ते पुढील भागात येत राहतीलच. कारण राज्य संविधानाचे आहे आणि प्रश्न उपस्थित करत राहणे, हा नागरिकाला, श्रमिक पत्रकाराला संविधानाने दिलेला अधिकार होय.