सातारा: फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील 10 जिल्हा परिषद गटात महायुतीतील निर्णायक घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास) यांना उमेदवार निवडीत विचारात न घेतल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची उद्या बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी सांगितले आहे.
विधानसभा मतदार संघात लोकजनशक्ती पक्षाचे तथा बहुजन समाजाचे प्राबल्य आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष स्व. तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या फलटण येथील सत्कार सभेला जमलेली गर्दी नव्हे तर पासवान साहेबांवर प्रेम करणारे हजारो लोकांची उपस्थिती हे बरेच काही सांगून जाते. सध्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्षाची घोडदौड सुरू आहे. परिणामी आम्ही राज्यात महायुतीत असल्याने काल पर्यंत झालेल्या निवडणुकीत शांत होतो. मात्र, अतिरेक झाला असून भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मतदार संघातील व महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे दोन नेते लढत आहेत. मात्र, सर्वाधिक निर्णायक मते असलेल्या लोकजनशक्ती पक्षाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे लोक जन शक्ती काय असते, हे दाखवण्याची वेळ आली असून त्याचा निर्णय उद्या सोमवारच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशाप्रकारे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी महायुतीच्या दोन्ही नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा