सातारा (सम्राट गायकवाड) : देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( श.प) धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय प्राप्त केला. मात्र, लोकसभेची एक वर्ष पूर्ण होवून अद्याप कोणतेही ठोस विकासकामे मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळालेले दिसत नाही. परंतु त्यांनी संचार मंत्रालयाकडे मागणी केलेल्या पत्रावर नुकताच एक सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय. परंतु त्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक डावलण्यात आला आहे? परिणामी दुर्लक्षित ठेवल्याचे दिसून येते.
सव्वा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी तत्कालिन भाजपचे खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा पराभव केला. मात्र, निवडणूक निकालात फलटणचे असलेले खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांना फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून यांना १८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तसेच पुढील झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढला. लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य केलेले आणि फलटण विधानसभा मतदारसंघावर सलग ३० वर्ष राजे गटाची तथा शरद पवार यांचा वरदहस्त असलेली एक हाती सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाकली. मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी भाजप व ना.एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अ. प) नेत्यांच्या सहकार्याने महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणले.
नेमके ह्या दोन्ही कारणांमुळे की काय ? विद्यमान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून फलटण - कोरेगांव विधानसभा जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला जात आहे का ? असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहे. कारण खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघात नव्याने १३ पोस्ट कार्यालय निर्मिती करण्याची मागणी केली होती.त्यांच्या मागणीला नुकतीच मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा.मोहिते पाटील यांनी सोशल मिडियाद्वारे दिलीय.
मात्र, लोकसभा मतदारसंघात नव्याने मंजूर झालेल्या १३ पोस्ट कार्यालयांमध्ये फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील एकाही गावाचा समावेश नसल्याचे ठळकपणे दिसून येते. परिणामी साहजिकच खा.मोहिते पाटील हे जाणीवपूर्वक फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ दुर्लक्षित ठेवत आहेत का ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोच. लोकसभा निवडणुकीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदारांनी मोहिते पाटील यांना मतदान केले. त्यांच्यात देखील ह्या निर्णयामुळे साहजिकच नाराजीचा सूर उमटणार आहे. तर ज्या मतदारांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांना मतदान केले. त्या मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्याकडून वाढलेल्या देखील दिसून येतात. कारण नुकतेच त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी खासदार असूनही रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा अद्याप दिल्लीत वट कायम असल्याचे अधोरेखित झाले .त्यांनी आता फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागात नव्याने पोस्ट कार्यालय मंजूर करून आणण्याची साहजिकच अपेक्षा त्यांचा मतदार करण्यास सुरुवात करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा