शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

बालकांना शिक्षण की वाहनतळ महत्त्वाचे? फलटणच्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !

सातारा :  शिक्षणाचे महत्व महापुरुषांनी कार्यातून व लेखनातून मांडले आहे.. परिणामी शिक्षणाच्या जोरावरच  देशात व विदेशात भारतीय विद्यार्थ्यांचा डंका वाजत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील फलटण येथील गोरगरीब व सर्वसामान्य घरातील बाल विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पहिले पाऊल टाकतानाच आज अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फलटण येथील महात्मा फुले चौका नजिक असलेल्या नगर पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गातच अंगणवाडीच्या बाल विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. परिणामी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत असल्याने शिक्षकांची कसरत होत आहे. तर उलट शाळेच्या समोरच उपलब्ध असलेली एक एकरपेक्षा अधिक जागा ( एके काळी खुले मैदान असलेली जागा ) व्यावसायिक वाहनतळ यासाठी देण्याचा महापराक्रम करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत त्या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, नूतनीकरण करत असताना प्रशासन आणि राज्यकर्त्यांना अंगणवाडी शाळेचा विसर पडला. विशेष बाब म्हणजे नगर पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय देखील त्याच ठिकाणी आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार असला तरी खासगी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेणे परवडणारे नाही. खासगी अंगणवाडीची ( नर्सरी ते सिनियर के. जी.) सरासरी वार्षिक फी 20 हजार रुपये इथपर्यंत आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी शाळेत व अंगणवाडीतदेखील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी प्रशासनाने देखील दखल घेवून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मात्र, नेमका उलटा प्रकार फलटणमध्ये सुरू आहे. अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील पालिकेच्या शाळेचे तीन वर्ग खासगी शिक्षणसंस्थेला भाड्याने दिले आहेत. तर आता दुसऱ्या ठिकाणी अंगणवाडीला वर्गच उपलब्ध नाही अन् समोरील एक एकर जागा वाहनतळ साठी देण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. तेव्हा किमान त्या अंगणवाडीला आणि त्या ठिकाणी शिक्षणाचे पहिले पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी अंगणवाडीचे नवीन वर्ग बांधण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शाळेच्या आवारात पुरेशी आणि प्रसंगी वाहनतळ येथे प्रचंड मोकळी जागा उपलब्ध आहे. तेथे राज्यकर्ते आणि प्रशासनाने ठरवले तर तत्काळ निर्णय घेवून अंगणवाडी इमारत उभारण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...