सातारा ( सम्राट गायकवाड) : देशात व राज्यात सत्तेसाठी सुरु झालेली राजकीय मिसळ आता तालुकास्तरावर देखील सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः ग्रामीण विकासकामांची नाडी असलेल्या मिनी मंत्रालय तथा जिल्हा परिषदेवर सत्ता काबिज करण्यासाठी ' झाले गेले विसरून ' सर्व बाजूने तडजोडीना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील राजे गट महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला. माञ, वर्षभरात आणि विशेषतः माळेगांव कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने घडलेल्या अनेक घडामोडीनंतर राजे गट आता ना. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत स्पष्टपणे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कदचित हा निर्णय झाला तर त्याचा मोठा परिणाम फलटणसह जिल्ह्याच्या राजकारणावर आणि आगामी स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होवू शकतो.
गेली २५ वर्ष सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व सध्या ( सत्तेतून दूर असल्याने ) डिफेन्स मोडवर असलेले फलटणचे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर व कुटुंबीय ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा स्पष्ट निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र, त्यामुळे स्वाभाविकच फलटणसह विशेषतः माण, सातारा आणि वाईचे नेतृत्वदेखील अलर्ट होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला फलटणमध्ये राजे गटाने स्वाभाविकपणे ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय कदाचित घेतलाच तर अगोदरच झालेल्या तालुक्याच्या राजकीय मिसळीत आणखी भर पडणार आहे. कारण, भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले फलटण विधानसभा मतदारसंघ ऐनवेळी ना.अजित पवार यांना सोडण्यात आल्याने भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. ना. अजित पवार यांनी केलेल्या सभा व फलटण व कोरेगाव तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते यांनी झोकून प्रचार केल्याने सचिन कांबळे पाटील यांचा विजय सहज शक्य झाला आणि राजे गटाच्या 30 वर्षाच्या अबाधित सत्तेला सुरुंग लागला. परिणामी फलटण तालुक्यातील राजे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप तर काहींनी ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. दिवसेंदिवस राजे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमीत्ताने ट्विस्ट निर्माण झाला आहे.
काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा जिल्हापरिषदेवर सत्ता राहिली आहे. माञ, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. जिल्ह्यात आठ पैकी 4 विधानसभा मतदार संघ भाजपकडे तर प्रत्येकी दोन मतदासंघ संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी व ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. उदयनराजे भोसले हे भाजपकडून लोकसभा तर नितीन पाटील हे राष्ट्रवादीकडून राज्यसभा खासदार आहेत. तर भाजपने दोन तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. अशा स्थितीत साहजिकच भाजपचे सातारा जिल्ह्यात प्राबल्य वाढत आहे तर तुलनेत जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवलेली राष्ट्रवादी मागे आहे. अशावेळी ना.अजित पवार यांनी माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचा कराड दक्षिण मधून प्रवेश घेतला तर माण - खटावमधून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा देखील प्रवेश झाला. मात्र, एवढ्या सैन्यावर सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता आणणे है ना.अजित पवार यांना भाजपच्या आव्हानासमोर कठीण असणार आहे. नेमके अशावेळी ३५ वर्ष राजकारणाचा अनुभव आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रभाव, संपर्क असलेले ज्येष्ठ नेतृत्व आ.रामराजे नाईक निंबाळकर व कुटुंबीय स्पष्टपणे ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यास मोठा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होवू शकतो. माञ, हा निर्णय घेताना साहजिकच ना.अजित पवार यांना स्थानिक आमदार व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजे गटाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या दिग्गज नेत्यांना विचारात घ्यावे लागणार हे स्वाभाविक असून त्यावरच पुढील निर्णय होवू शकतो.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा