मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच सावध केलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांची स्वतःच्या माण तालुक्यात आणि जिल्ह्यात तसेच कुटुंबात देखील नालस्ती झालीय. त्यांच्या थोरल्या वाहिनी तसेच चुलत भाऊ दोघांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झालाय. तर त्यांनी सातारा जिल्ह्यात घेतलेल्या सभांमध्ये बहुतांश उमेदवारांचा पराभव झाला आहे. 


रेशनिंग दुकानदाराचा पोरगा म्हणून सभेत एका बाजूला संबोधित करत सहानुभूती घेत असताना दुसऱ्या बाजूला सरंजामशाही आणि घराणेशाही जोपासण्याला माण आणि खटाव तालुक्यातील जनतेने ओळखले. इंटरनेट आणि AI च्या जगात शिंगणापूर आणि वारुगडच्या पोराला सत्य समजते. पाण्याच्या प्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात आलात . मतदारांनी उचलून घेतले प्रसंगी आपटण्याचा ही प्रयत्न केला. मात्र, 17 वर्षात अद्याप माण खटाव मतदारसंघातील पाणी प्रश्न समूळ नष्ट झालेला नाही.

माण आणि खटाव तालुक्याचे हक्काचे पाणी किती ? ते वितरीत होते का ? ह्यावर बोलणारे डॉ येळगावकर यांना शांत केले तरी मतदारांनी मतदानातून आपले मत व्यक्त केले आहे. मोगराळयाच्या घाटावरून खाली येऊन फलटणच्या घराणेशाहीवर टीका केली. आणि स्वतः काय केले ? तीन भावांना उमेदवारी ? एक उजवा हात. दुसरा चाणक्य. छोटा बाहुबली. उजवा हात आणि चाणक्य म्हणणारे घरी बसले. बाहुबली निवडून आले. ( कान कोणाला गमवायचा नव्हता)

एकूणच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी एक घोषणा करून दीड वर्ष झाले. ग्रामविकास विभागात लाडकी बहीण त्यावर मताचा जोगवा निवडणुकीत मागितला. मताचा जोगवा ग्रामविकास खात्याच्या प्रभावी कामगिरीवर मागायला हवा होता. मात्र, ठोस कामगिरी शून्य.

पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची योजना त्यात राज्य सरकार सहभाग घेईल आणि 50 हजार अनुदान देईल. छाती बडवून सांगितले. दोन वर्ष उलटून ही राज्य सरकारचे 50 हजार देण्यात जयकुमार गोरे ग्रामविकासमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. कार्यकर्ते,मतदार आणि पक्ष वापरून आणि फेकून द्या. ही रणनिती आता मतदार आणि सर्व पक्षांनी ओळखली असून त्यामुळेच ग्रामविकास मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांची लाज विरोधकांनी राज्यात घालवली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीला अजून साडे तीन वर्ष शिल्लक आहेत. कसे वागायचे हे..हे प्रभाकर देशमुख यांनी ठरवले पाहिजे.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा भीम आर्मी संघटनेकडून निषेध

फलटण : तेलंगणातील संगारेडी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे समाजात तीव्र संताप निर्माण झाला असुन या घटनेचा भीम आर्मी संघटनेने  फलटण येथे निषेध व्यक्त केला.

फलटण येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला .संघटनेकडून सांगण्यात आले की, महाराष्ट्रसह देशात काही धार्मिक टोळ्या धिंगाणा घालू लागल्या असून या प्रमुख्याने महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करीत असुन  देशाच्या ऐकतेला, धर्मनिरपेक्षता हानी पोहचवित असुन अशा समाजघातकी, राष्ट्रघातकी लोकांवर वेळेतच कडक कारवाई करावी . महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक समतेवर, स्वातंत्र्यवर हा घात असून तो कदापि सहन करणार नाही असे संघटने कडून सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे आदी. उपस्थित होते.

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

निवडणुकीच्या निमित्ताने पुरोगामी फलटण अंधश्रद्धेच्या विळख्यात ; पोलिसांनी सखोल तपास करण्याची आवश्यकता

फलटण : ऐतिसाहिक आणि पुरोगामी वारसा असलेल्या फलटणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने अंधश्रद्धेचे बीज रोपण्याचा प्रकार नुकताच घडला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराभोवती अघोरी बाबांनी घिरट्या घातल्या तर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर उतारा ठेवण्याचा प्रकार घडला. वास्तविक दोन्ही प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे अपेक्षित असून पोलिस प्रशासनाने सो मोटो पुढाकार घेऊन व अधिक तपास करून वेळीच गुन्हा दाखल करणे आवश्यकता आहे.


मतदानाच्या आदल्या दिवशी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी तथाकथित अघोरी बाबांनी घिरट्या घातल्या व पुढे जात असताना विडणी येथे गाडी पकडण्यात आली. मात्र, पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता ती गाडी सोडून दिली. वास्तविक कायद्यानुसार त्या तथाकथित बाबांना पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी करून तपासाअंती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक होते.मात्र, तसे घडले नाही. म्हणूनच की काय त्याच दिवशी रात्री विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर उतारा ठेवण्याचा प्रकार घडला. मात्र, त्या घटनेत देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वास्तविक दोन्ही परस्पर घटनेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करणे अपेक्षित असताना अद्याप फिर्याद दाखल केली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

ही कायदेशीर व राजकीय निवडणुकीत घडलेला प्रकार असला तरी ऐतिसाहिक आणि पुरोगामी वारसा असलेल्या फलटण शहर व तालुक्याला ह्या गोष्टी अशोभनीय आहेत. ह्या घटनांचा वेळीच छडा न लावला गेल्यास आगामी निवडणुकांमध्ये असे प्रकार वाढण्यास अधिक बळ दिले गेले जाईल. वास्तविक साताऱ्याचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल देशाने आणि जगाने घेतली. अखेर त्यांचे कार्य खुपणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा पुण्यात दिवसा गोळ्या झाडून खून केला. मात्र, त्यांचे कार्य व विचार सर्वत्र पोहचला गेला. तदनंतर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील केला. मात्र, आता फलटणमध्ये घडलेल्या घटना पाहिल्यानंतर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची निश्चित खंत वाटते. फलटण पोलिसांनी दोन्ही घटनांचा समूळ तपास करून आरोपींवर गुन्हे दाखल करणे आवश्यक असून अन्यथा भविष्यात ह्यापेक्षा देखील अंधश्रद्धेतून भयानक प्रकार घडण्याची आणि पुरोगामी फलटणची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होवू शकतो.

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

फलटणमध्ये राजे गटाची पराभवाची हॅट्रिक होणार की कमबॅक करणार ; मा.खासदार गटाची चारही बाजूने जोरदार फिल्डिंग

सातारा: (सम्राट गायकवाड ) गेली 35 वर्ष फलटण तालुक्यावर एक हाती सत्ता असलेल्या राजे गटाची विधानसभा नंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने संपूर्ण ताकद झोकून देत ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला मा.खासदारांच्या व आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी यांनी राजे गटाला चारी बाजूने घेरत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी तसेच पंचायत समितीवर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मागील दोन्ही निवडणुकीत राजे गटाच्या अनेक शिलेदारांनी साथ सोडत मा.खासदार गटाची साथ धरली आहे. सद्यःस्थितीत राजे गट एकाकी पडला असून अस्तित्व टिकवण्याची लढाई म्हणून ते लढत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढून झालेली चूक भरून काढत त्यांनी नगरपालिका निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेना सोबत जाण्याचा मार्ग निवडला. मार्ग निवडण्यामागे साहजिकच अनेक कारणे आहेत. मात्र, शिवसेना पर्याय निवडेपर्यंत फलटण शहरातील राजे गटाच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी मा.खासदार गट यांची साथ धरली होती. त्यामुळे नगर पालिका निवडणुकीत राजे गटाला उमेदवार मिळवण्यासाठीपासून संघर्ष करावा लागला. तर नगराध्यक्षपदासाठी समोरून मा.खासदार यांचे बंधू उभा राहिल्याने साहजिकच राजे गटाला देखील घरातीलच म्हणजे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांना रणांगणात उतरावे लागले. मात्र, जनतेशी त्यांचा थेट कनेक्ट नसल्याने फलटणच्या जनतेने त्यांना नाकारले.

सलग दोन पराभव झाल्यानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने अस्तित्वाची लढाई म्हणून ते लढत आहेत. सद्यस्थितीत राजे गटाकडे सरदार यांची संख्या अल्प असून लढाई ही मावळ्यांच्या सहकार्याने लढावी लागत आहे. त्यांच्याकडे असलेल्या श्रीराम व दत्त शुगर, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, गोविंद मिल्क, कमिन्स ही मोठी जमेची बाजू आहे. 

तर समोर मा.खासदार यांच्यासोबत फलटण तालुक्यातील बहुतांश सर्व बाजूचे दिग्गज नेते सोबत आहेत. मात्र, त्यापैकी काही नेत्यांबद्दल देखील ग्राऊंडवर अनेक कारणांनी नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याचे आव्हान खासदार यांना करावे लागणार आहे. ते त्यांनी जाणले म्हणूनच दूधेबावी येथील सभेत त्यांनी भाष्य देखील केले. साहजिकच त्यांनी त्यानंतर स्वतः ग्राउंड कनेक्ट सुरू केला असेलच.

एकूणच गेल्या 30 वर्षात प्रथमच एक ही नाईक निंबाळकर ह्या निवडणुकीच्या रणांगणात नाही.हे वैशिष्ट्य असले तरी लढाई जोरदार होत असून साहजिकच मतदानाच्या आदल्या रात्रीच जो काय तो खऱ्या अर्थाने प्रचार होणार आहे. आता जो काही प्रचार होत आहे ती आरोपचरिकता. तूर्त एवढेच.



 




रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

महायुतीत लोकजनशक्ती पक्षाला विचारात न घेतल्याने संताप; फलटणच्या दहा गटात वेगळा विचार करणार : विजयराव गायकवाड

सातारा: फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील 10 जिल्हा परिषद गटात महायुतीतील निर्णायक घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास) यांना उमेदवार  निवडीत विचारात न घेतल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची उद्या बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

विधानसभा मतदार संघात लोकजनशक्ती पक्षाचे तथा  बहुजन समाजाचे प्राबल्य आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष  स्व. तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या फलटण येथील सत्कार सभेला जमलेली गर्दी नव्हे तर पासवान साहेबांवर प्रेम करणारे हजारो लोकांची उपस्थिती हे बरेच काही सांगून जाते. सध्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्षाची घोडदौड सुरू आहे. परिणामी आम्ही राज्यात महायुतीत असल्याने काल पर्यंत झालेल्या निवडणुकीत शांत होतो. मात्र, अतिरेक झाला असून भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मतदार संघातील व महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे दोन नेते लढत आहेत. मात्र, सर्वाधिक निर्णायक मते असलेल्या लोकजनशक्ती पक्षाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे लोक जन शक्ती काय असते, हे दाखवण्याची वेळ आली असून त्याचा निर्णय उद्या सोमवारच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशाप्रकारे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी महायुतीच्या दोन्ही नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे.

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

शूक...... सातारा जिल्ह्यात कायद्याचे राज्य चालू आहे...! पोलीस ठण्यासमोर लाडक्या बहिणींनी हंबरडा फोडला ; भाजप शहराध्यक्षांनी मोर्चे काढले

सातारा ( सम्राट गायकवाड) :  'सदरक्षणाय खलनिग्रहनाय ' म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण, अशा ब्रीदवाक्यानुसार पोलीसदलाने कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असते. मात्र, खरचं अशा प्रकारे कारभार न होता अक्षरशः उलट्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातील ठराविक पोलिस अधिकारी आणि लाडक्या कर्मचाऱ्यांकडून कारभार सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांना अजित मल्टीस्टेट बँकेच्या गैरकारभारा विरोधात पीडित शेकडो महिलांना घेवून फलटण पोलीस ठाण्यात कैफियत मांडावी लागते, प्रजासत्ताकदिनी मोर्चा देखील काढावा लागतो, मात्र साधी एक एफ.आय.आर.घेतली जात नाही. हे आहे कायद्याचे राज्य ? 

मात्र, ६ मार्च २०२४ रोजी ह्याच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नसताना २० वर्ष प्रामाणिक पत्रकारिता केलेल्या पत्रकाराला बोलावले जाते. तीन तास बसवून ठेवले जाते आणि पुढे बेकायदेशीररित्या खासगी गाडीत डांबून घालत सातारला शहर पोलिस स्टेशन येथे नेले जाते. त्या ठिकाणी तीन तास बसवून ठेवले जाते. अन् मग रात्री १० वाजता खोटी एफ.आय.आर.तयार करून खोटे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, पुढे जेव्हा न्यायालयात निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी त्याबाबतचे फलटण ग्रामीणचे सीसीटिव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागून देखील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक हे जाणीवपूर्वक देण्यास नकार देतात. हे आहे कायद्याचे राज्य...?

त्याच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महाडिक यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि विशेष म्हणजे गृहमंत्रीपद असलेल्या भाजप फलटणचे शहरअध्यक्ष अनुप शहा  तसेच २०० पेक्षा अधिक फसवणूक झालेल्या पीडित महिला आपली कैफियत मांडत आहेत. मात्र, ते आवाज ऐकायला तयार नाहीत. एक साधी एफ.आय.आर.देखील दाखल करून घ्यायला तयार नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला एफ.आय.आर.दाखल नसताना निरपराध पत्रकाराला डांबून ठेवतात आणि खासगीत अनेकांना सांगतात माझ्यावर वरिष्ठांचा दबाव होता. हे आहे कायद्याचे राज्य...?



आता भाजप शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी आज शेकडो पीडित महिलांना घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा येथे भेट घेतली. नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक पाहता महायुती सरकार आणि त्यांचे सरकारमधील तिन्ही भाऊ हे आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान करत आहेत तर दुसऱ्या बाजूला फलटण ग्रामीण पोलीस ठण्यासमोर अन् विशेष बाब म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाडक्या शेकडो बहिणी हंबरडा फोडत आहेत. तेव्हा आजच पहिली एफ.आय.आर.दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र, काल २६ जानेवारी रोजी  पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ज्या प्रकारे मोठ्या भाजप शहराध्यक्ष अनुप शहा यांच्याशी सुरुवातीला मोठ्या आवाजात अन् मिडियाचे कॅमेरे दिसल्यानंतर खाली आवाज करून आमचा तपास सुरू आहे, मी चुकलो तर पोलिस अधीक्षक माझ्यावर कारवाई करतील. ही भाषा सरकारच्या लाडक्या आणि हंबरडा फोडणाऱ्या बहिणींना पोलीस निरीक्षकाची आहे. म्हणूनच अशा कायद्याचे राज्य असलेल्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाडक्या बहिणींना आणि नेतृत्व करत असलेल्या अनुप शहा यांना न्याय मिळेल? ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण हे राज्य कायद्याचे आहे ?

विशेष बाब म्हणजे मागील १५ दिवसापूर्वी फलटण तालुक्यातील विडणी येथे शेतात अज्ञात महिलेचा अमानुषरित्या खून झाल्याची घटना घडली. अवयवाचे अनेक तुकडे केल्याने मृत महिलेची ओळख देखील अद्याप पटली नसल्याची माहिती समोर येत आहे अन् दुसऱ्या बाजूला आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. साहजिकच बक्षीस जाहीर करणे कायदेशीर प्रक्रिया असली तरी यावेळी पोलीस दलाच्या डिटेक्शन आणि एल.सी. बी. अशा ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात ते पुढील भागात येत राहतीलच. कारण राज्य संविधानाचे आहे आणि प्रश्न उपस्थित करत राहणे, हा नागरिकाला, श्रमिक पत्रकाराला संविधानाने दिलेला अधिकार होय. 

 






















 
 

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

फलटणमध्ये वातावरण तापलं ; श्रीराम सह. कारखान्याच्या व्यवहाराची E.D. मार्फत चौकशी करा : माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व अँड.नरसिंह निकम यांची मागणी

सातारा :  लोकसभा आणि विधानसभेनंतर फलटणमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे सभासद व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांना सत्ताधारी राजेगटाने शब्दात घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व अँड. नरसिंह निकम यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत कारखान्याच्या मागील १५ वर्षाच्या कारभारावर सडकून टीका केली. भागीदारी तत्वावर चालविलेल्या श्रीराम व जवाहर कारखान्याच्या व्यवहाराची ई. डी. संस्थेकडून सखोल चौकशीची मागणी  केली.तसेच कराराची सर्व कागपत्रे घेऊन समोरासमोर येऊन पत्रकारपरिषद घेण्याचे आव्हान देखील त्यांनी राजे गटाला दिले.

तत्कालिन चेअरमन स्वर्गीय हणमंतराव पवार यांचे निधन झाले तेव्हा कारखान्यावर १८ कोटींचे कर्ज होते त्यापैकी १६ कोटी रुपयांची साखर शिल्लक होती. अशा खंबीर स्थितीत तेव्हा कारखाना होता. मात्र, त्यानंतर आलेले चेअरमन यांना कर्ज मिळूच नये आणि कारखाना कसा अडचणीत येईल, यासाठी राजेगटाने प्रयत्न केले. त्यामुळे कारखाना अवसायनात काढण्याचे जे शब्द राजे वापरत आहेत ते खोटे आहेत. उलट त्यानंतर गेली १५ वर्षापासून जवाहर सहकारी साखर कारखान्याला भागीदारी तत्वावर चालविण्यास दिला आहे. मात्र, हा करार दोन कारखाना ऐवजी दोन संस्थांच्या नावावर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या नफ्याचे पैसे गेली अनेक वर्ष ठराविक दोन व्यक्ती खात आहेत.मंत्री समितीच्या सूचना डावलून प्रति टन 200 रुपये ऐवजी फक्त 30 रुपये प्रति टन दराने कारखाना देण्यात आला आहे. तसेच जवाहर कारखान्याने दिलेली अनामत रक्कमेवर १२ टक्क्यांनी व्याजसहित परत देण्याचे कबूल केल्याने 15 वर्षानंतर देखील कारखाना कर्जातून बाहेर येऊच शकत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत होणाऱ्या लेखा परीक्षण चौकशी अहवाल समोर येताच ऑडिटरने E.D. कडे गुन्हा दाखल करावा व सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले व अँड. नरसिंह निकम यांनी केली.

विश्वासराव भोसले म्हणाले, दोन दिवसापूर्वी झालेली कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत माझ्यावर न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याबाबत आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी बेकायदा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सभेत मी विचारलेल्या प्रश्नांना बगल देण्यात आली. वास्तविक कारखान्यावर नेमलेला प्रशासक जारी हटविण्यात आला असला तरी राज्य सरकारने कारखान्याच्या संपूर्ण व्यवहार आणि टेंडर प्रक्रियेचे लेखापरीक्षण सुरू केले आहे. त्याचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर पुढील निर्णय होईल. कारखान्याच्या निवडणुकीला आम्ही केव्हाही तयार आहोत मात्र सभासद मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे. अनेक बोगस सभासदांची नोंदणी सत्ताधारी राजेगटाने केली आहे. तसेच मी आवाज उठवलिल्यानंतर मृत्यू झालेल्या सभासदांची वारस नोंद सुरू केली आहे मात्र ती अजून देखील अपुरी आहे. रामराजे यांनी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण याचिका मागे घेणार नसल्याचे विश्वासराव भोसले यांनी ठणकावून सांगितले. 

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...